श्री मोरेश्वर सेवा संघ - आमच्याबद्दल
सन १९९७ मध्ये वाचनाच्या प्रेमामुळे काही मित्रांनी एकत्र येऊन श्री मोरेश्वर सेवा संघाचे हे रोपटे लावले. यासाठी श्री. श्रीधर साठे, कै. श्री. अरविंद कट्टी श्री. सुशील जोशी, श्रीमती शैलजा टिल्लू, श्री. भा. य. करंबेळकर, श्री. शशिकांत काजरेकर यांनी पुढाकार घेतला. श्री. श्रीधर साठे यांच्यावरील विश्वासाने अनेक सुजाण नागरिक संस्थेचे आजीव सभासद झाले. ग्रंथालयासाठी अनेकांनी पुस्तकं देऊ केली. कै. श्री. मधू देसाई तसेच सुविद्या प्रसारक संघ यांनी जागा वापरायला दिली त्यामुळे संस्थेला स्थैर्य आलं. माननीय श्री. गोपाल शेट्टी (माजी आमदार, खासदार) यांच्या प्रयत्नाने ग्रंथालयाला स्वत:ची वास्तू मिळाली.
अतिशय लहान जागेत सुरू झालेलं हे ग्रंथालय अनेकांच्या सहाय्याने, संगोपनाने पुढे बऱ्यापैकी रुजले. संस्थापक सदस्यांनी त्याला एका संघटनेचे रूप देऊन, कायदेशीर नोंदणी करून त्याचे अस्तित्व दीर्घकाळ राहील याची तजवीज केली. संस्थेचा मुख्य उद्देश समाजात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा आहे. वाचन हे शिक्षण आणि प्रगतीचे मूलभूत साधन आहे, असा संस्थेचा दृढ विश्वास आहे. श्री. वासुदेव कामत (पद्मश्री सन्मानाने गौरवान्वित) यांनी साकारलेले बोधचिन्ह आणि ‘वाचनेन विकासः’ हे संस्थेचे बोधवाक्य हाच विश्वास, हेच ध्येय स्पष्ट करते.
ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबई येथे नोंदणीकृत असलेली एक स्वयंसेवी संस्था असून तिचा नोंदणी क्रमांक F – 22547 (मुंबई) असा आहे. तसेच सन १९९७ मधील ही संस्था सोसायटी नोंदणी अधिनियम / धर्मादाय ट्रस्ट अधिनियम अंतर्गतही नोंदणीकृत असून त्यांच्या सर्व नियमांचे पालन करण्यास बांधील आहे. तसेच आयकर कायद्याच्या कलम ८०G अंतर्गत देणग्या स्वीकारण्याची मान्यता संस्थेला प्राप्त असल्याने देणगीदारांना आयकर सवलतीचाही लाभ मिळू शकतो.
आजवरच्या सर्व कार्यकारिणींनी अतोनात कष्ट उपसले व काही धाडसी निर्णय घेतले. तसेच माननीय श्री. गोपाल शेट्टी (माजी आमदार, खासदार) आणि श्री. सुनील राणे (माजी आमदार) यांच्या सारख्या तत्कालीन लोक प्रतिनिधींच्या सहकार्याने ही संस्था वाढवली व स्थिरावली. विद्यमान आमदार माननीय श्री. संजय उपाध्याय यांनी संस्थेच्या प्रांगणात स्थायी स्वरूपाचा मंच बांधून दिल्याने अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं सुकर झालं आहे. आज श्री मोरेश्वर सेवा संघा कडे स्वतःची वास्तू आहे व सात हजाराहून अधिक मराठी व इंग्रजी ग्रंथ संपदा आहे. दिवाळी अंकांसह साहित्यिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विषयांवरील पुस्तके यामध्ये समाविष्ट आहेत. तसेच विविध पुराणे, कोश आणि इतर दुर्मीळ संदर्भग्रंथही येथे उपलब्ध आहेत.
संस्थेचे सुमारे १६० आजीव सभासद आणि ३०० नियमित सभासद असून ते वाचनालयाच्या सुविधेचा नियमित लाभ घेतात. पुस्तकांची देव घेव संगणीकृत प्रणाली द्वारे होते. संस्थेचे ९५% हून अधिक आर्थिक व्यवहार डिजिटल माध्यमाद्वारे होतात. सर्व व्यवस्थापन कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून केले जाते.
ग्रंथालय स्थिरावल्यानंतर संस्थेला असे जाणवले की CA, ICWA, LLB इत्यादी व्यावसायिक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत, अभ्यासपूरक वातावरणाची अत्यंत गरज आहे; मात्र परिसरात अशी सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे वाचनालयाच्या जागेतच विद्यार्थ्यांसाठी वायफाय सह वातानुकूलित अभ्यासिका नाममात्र शुल्क घेऊन सुरू केली. परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण उच्च शिक्षण व चांगले व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना विनामूल्य अभ्यासिका सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ही अभ्यासिका वर्षातील ३६५ दिवस रोज १४ तास अभ्यासासाठी उपलब्ध असते. आजवर शेकडो विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला असून स्वतःची प्रगती साधली आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासिकेत प्रवेश मिळवण्याच्या प्रतीक्षा यादीत आहेत. आपल्या करिअरमध्ये प्रगती साधू इच्छिणाऱ्या युवकांमध्ये वाचनाची आवड व ज्ञानसक्षमीकरण वाढविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. तसेच महाराष्ट्रातील दुर्गम भागातील संस्था व वाचनसंस्कृती रुजवू इच्छिणाऱ्या शाळांना गैर-शैक्षणिक पुस्तके पुरवली आहे.
संस्था काटेकोर आर्थिक शिस्त पाळत असून सर्व लेखापुस्तके नियमित व अद्ययावत ठेवते. कायदेशीर नियमांनुसार व आवश्यकतांनुसार दरवर्षी लेखापरीक्षण केले जाते. प्राप्त होणारा सर्व निधी संस्थेच्या उद्दिष्टांसाठीच वापरण्यात येतो.
साहित्यप्रेमी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रबोधन व त्यांच्या मनोरंजनासाठी वर्षभरात विविध व्याख्याने, चर्चासत्रे, काव्यवाचन कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शने इत्यादी उपक्रम संस्थेतर्फे आयोजित केले जातात. निवडणुकांच्या वेळी मतदानाचे महत्त्व व मतदान न केल्याचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती कार्यक्रम पण संस्थेने आयोजित केले आहेत.
शिक्षण, वाचनसंस्कृती, साक्षरता प्रसार व ज्ञानसक्षमीकरणाच्या कार्यात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि समर्पण कायम राखण्यासाठी संस्था वचनबद्ध आहे.